FILMISPACE.IN

Latest National & International News Of Entertainment, Sports, Politics & Business

नव्या चेहऱ्यांची नवी प्रेमकहाणी; ‘धप्पा’चा रोमँटिक फर्स्ट लुक पोस्टर समोर, ९ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘प्रेम मिळालं तर नशीब, नाहीतर…’ या हळुवार ओळीने प्रेमाची एक नवी, निरागस कहाणी सांगणाऱ्या ‘धप्पा’ या आगामी मराठी चित्रपटाच फर्स्ट पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. ‘वृंदावन एंटरटेनमेंट अँड फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटातून नवोदित कलाकारांची जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता सागर भंडारे आणि अभिनेत्री प्रतिक्षा अत्राम हे नवोदित कलाकार पहिल्यांदाच या चित्रपटामार्फत एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘धप्पा’च्या पोस्टरमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीचा सुंदर साज आणि त्यात फुलणारं निरागस प्रेम पाहायला मिळणार असल्याचं पोस्टरवरून कळतंय.

प्रेम, मैत्री, नात्यांमधील भावनिक गुंफण आणि तरुणाईच्या मनातील हळुवार भावना या सगळ्यांचा सुंदर मिलाफ ‘धप्पा’ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार असल्याची झलक पोस्टरमधून मिळत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रविराज लिंबादास वाव्होळे यांनी केलं असून, कथा, पटकथा आणि संवाद सागर गीता चांगदेव भंडारे यांनी लिहिले आहेत. विशेष म्हणजे ‘धप्पा’च्या माध्यमातून नवोदित कलाकारांना रुपेरी पडद्यावर आपली अभिनयाची छाप उमटवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सागर आणि प्रतिक्षा या नव्या कलाकारांची ताजी जोडी आणि त्यांची प्रेमकहाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक रविराज म्हणाले, “हीच गोष्ट आम्ही पडद्यावर घेऊन आलो आहोत. ‘धप्पा’ पाहताना तुम्हाला पडद्यावरची कथा परकी वाटणार नाही, तर कुठेतरी ती तुमचीच कहाणी आहे, असं जाणवेल.

प्रेम, नातेसंबंध, संघर्ष, राजकारण आणि आयुष्यातील अनपेक्षित वळणं यांची सांगड घालत ‘धप्पा’ प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडणारा अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे”.

चित्रपटाची निर्मिती सपना पोपट ढेरंगे, माधुरी राहुल दिवसे आणि सागर गीता चांगदेव भंडारे यांनी केली असून, विनोद दत्तात्रय भंडारे, अजित साहेबराव भंडारे आणि शंभु सचिन भंडारे हे सहनिर्माते आहेत. ‘धप्पा’ हा चित्रपट केवळ दोन व्यक्तींच्या प्रेमाची गोष्ट नसून, प्रेमाच्या वाटेवर येणारे चढ-उतार, नात्यांची हळुवार गुंफण आणि ग्रामीण मातीत फुलणारं निरागस प्रेम यांची भावस्पर्शी कहाणी असल्याचं पोस्टरवरून जाणवतं. त्यामुळे हा चित्रपट तरुणाईसोबतच कौटुंबिक प्रेक्षकांनाही भावेल, अशी अपेक्षा आहे. ९ ऑक्टोबरपासून ‘धप्पा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नव्या कलाकारांची ही नवी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनावर किती मोठी छाप पाडते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

नव्या चेहऱ्यांची नवी प्रेमकहाणी; ‘धप्पा’चा रोमँटिक फर्स्ट लुक पोस्टर समोर, ९ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला